पालखी प्रस्थान काळात अखंड वीज पुरवठा   

पालखी काळासाठी संपर्क क्रमांक
नियंत्रण कक्ष : ७७४४९७४५४४
तक्रार निवारण कक्ष : ७८७५७२७७६५
 
पिंपरी : आषाढी वारीसाठी देहूतून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या बुधवारी(ता.१८) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यानिमित्त येणार्‍या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी महावितरण कंपनीकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे.प्रस्थान सोहळा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरणचे कर्मचारी २४ तास कामावर हजर राहणार आहेत. देहू गावातील विद्युत पुरवठा अखंड सुरू राहावा, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती प्राधिकरण उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे, सहायक अभियंता संतोष झोडगे यांनी दिली.
 
सरोदे म्हणाले, ‘‘सध्या पावसाळा सुरू असल्याने काही वेळा वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता असते. मात्र, पालखी प्रस्थान सोहळा काळात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. यासाठी २५ कर्मचारी यासाठी नेमण्यात आले आहेत. देऊळवाडा आणि परिसरातील वीज खांबांवरील विद्युतवाहिनी तारा आणि डीपी बॅाक्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. इनामदारवाडा परिसरात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम करण्यात आले असून, तेथे दुरुस्ती करण्यात आली आहे. माळवाडी, विठ्ठलवाडी, गाथा मंदिर परिसरात वीज खांबांची दुरुस्ती करण्यात आली आहे.’’
 
अखंड वीजपुरवठ्यासाठी उपाययोजना
 
जुना पालखी मार्गावर ५०० मीटर बॅक फीडिंग केबल टाकण्यात आली आहे. देहू परिसरात पंधरा ठिकाणी डीपीचे नवीन बॉक्स कार्यान्वित. चिंचोली आणि तळवडे येथील फीडरवरून वीज पुरवठा उपलब्ध. देहू ते देहूरोड या पालखी मार्गावर इन्सुलेटेड केबल टाकण्याचे काम पूर्ण. पालखी मार्गावर सात ठिकाणी नवीन उंच विद्युत खांब उभारणी. सोहळा काळात वीज यंत्रणेसाठी २५ कर्मचारी तैनात. तसेच तळवडे, देहू, देहूरोड, निगडी येथील सहायक अभियंता देखरेख करणार आहेत. तत्काळ तक्रार निवारणासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध.पाणी पुरवठा केंद्राजवळ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उपलब्ध

Related Articles